आई, पत्नी अन् मुलाचाही घेतला जीव; नराधम आरोपीला आता घडली आयुष्यभराची अद्दल

 आई, पत्नी अन् मुलाचाही घेतला जीव; नराधम आरोपीला आता घडली आयुष्यभराची अद्दल

बार्शी न्यायालयाने आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे याला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


आई, पत्नी अन् मुलाचाही घेतला जीव; नराधम आरोपीला आता घडली आयुष्यभराची अद्दल Solapur Crime : बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील पत्नी आणि सावत्र आईच्या भांडणास कंटाळून झोपेत असलेली सावत्र आई व मुलास अनिरुद्ध बरडे हातोड्याने मारून जागीच ठार केले, तर पत्नीच्या पोटात कुकरी फिरवून जखमी करून अंगावर रॉकेल ओतून मारून टाकल्याने तिहेरी खूनप्रकरणी बार्शी न्यायालयाने आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे यास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील आरोपी अनिरुद्ध व्यंकट बरडे (रा. कोरफळे) याने घरी सतत होत असलेल्या बायको आणि सावत्र आईच्या भांडणाला कंटाळून दि. ९-२- २०१७ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरी झोपलेल्या सावत्र आई सखुबाई व मुलगा सुदर्शन यांना हातोड्याने मारून जागीच ठार केले, तर त्याची पत्नी रेश्मा हिचे पोटात कुकरी मारून ती कुकरी फिरवून बाहेर ओढून काढून गंभीर जखमी करून, तिच्या अंगावर रॉकेल टाकून काडीपेटीतील काडीने पेटवून दिले. तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर ती उपचाराच्या दरम्यान मयत झाली, तसेच मुलगा अविनाश व मुलगी प्रतीक्षा यांनाही कुकरीने मारून जखमी केले. त्यानंतर, स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

१६ साक्षीदार तपासले

सरकारच्या वतीने १६ साक्षीदार तपासण्यात आले. यातील आरोपीची बायको हिने दिलेला मृत्युपूर्व जबाब, नेत्र साक्षीदार आरोपीची मुलगी, दुसरा मुलगा व डॉक्टर यांची साक्ष, तसेच तपासी अंमलदार यांनी तपासाच्या दरम्यान गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे हे सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडले.

अशी सुनावली शिक्षा 

सरकारी पक्षाच्या पुराव्याचा विचार करता, न्या.एल.एस चव्हाण यांनी यांनी आरोपी अनिरुद्ध बरडे (रा. कोरफळे) यास ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेप आणि १ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास, भादं. संहिता कलम ३०७ अन्वये दोषी ठरवून १० वर्ष शिक्षा, ५० हजार रुपयांचा दंड, तो न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.