लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे बुरखे फाटले, तुम्ही एक नंबरचे खोटारडे”, संजय राऊतांचा घणाघात

लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे बुरखे फाटले, तुम्ही एक नंबरचे खोटारडे”, संजय राऊतांचा घणाघात 

सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजना आणि कॅगचा अहवाल यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. या निवडणुकीत महायुतीची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चांगलीच चर्चेत आहे. या योजनेतंर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. तसेच आता लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यात आला आहे. लवकरच हा हप्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे काही निकष बदलण्यात आले आहेत. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त बोजा हा सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजना आणि कॅगचा अहवाल यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. “लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला आहे.

“राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे हे सरकार म्हणून तुमचे अपयश आहे. त्याचे खापर लाडक्या बहिणींवर का फोडत आहात? ‘कॅग’नेही ताशेरे ओढले आहेत ते तुमच्या आर्थिक धोरणांवरच. तेव्हा लाडक्या बहिणींच्या नावाने गळा काढत कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे उद्योग थांबवा! लाडक्या बहिणींना नवीन निकषांचा तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा बागुलबुवा दाखविणे बंद करा! घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे”, असे सामना अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.